पवनी
येथील राजकीय व सामाजिक क्षेत्रात सक्रिय तथा भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष म्हणून यशस्वीपणे काम करणारे युवा नेतृत्व अमोल मनोहरराव तलवारे यांचे कोरोना संसर्गाने आज नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
चालू सप्ताहात पवनी शहरात कोरोनाने कहर केला असून हॉटस्पॉट म्हणून जिल्ह्यात प्रसिद्धीस आले असतांना अमोल तलवारे यांचे झालेले निधन पवनीकरांना वेदनादायी ठरले . ऐन तारुण्यात निसर्गाने घातलेली झडप शहरवासीयांना दुखात टाकून गेली. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे. मध्यम कुटुंबात जन्मलेल्या अमोलने स्वकर्तृत्वाने तालुक्याच्या राजकारणात विशेष ओळख तयार केली. कुटुंबात कुठलाही राजकीय गंध नसतांना त्यांनी सोडलेली छाप जनतेच्या कायम स्मरणात राहील. त्यांच्या कर्तृत्वाने अमोल तलवारे यांनी भारतीय जनता पक्षाच्या शहर व तालुका अध्यक्ष पदापर्यंत मजल मारली असून सामाजिक क्षेत्रात काम करतांना विश्व हिंदू परिषदेचे यशस्वी कार्यकर्ते म्हणून त्यांचा गौरव देखील झाला असल्याचे मित्रमंडळी सांगतात.
मागील दोन दिवसांपूर्वी अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना भंडारा येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र प्रकृती जास्तच असल्याने त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले. उपचारादरम्यान तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी ते 37 वर्षाचे होते. त्यांच्या मागे आई, बहीण, दोन भाऊ, पत्नी, मुलगा व बराच मोठा आप्तपरिवार आहे. भावंडांमध्ये ते सर्वात लहान होते