परमेश्वर सावंत
विभागीय संपादक मराठवाडा
हिंगोली : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत यंदा परभणी, हिंगोली जिल्ह्यात हमीभावाने मूग, उडदाची खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सहकारी पणन महासंघ, विदर्भ सहकारी पणन महासंघाच्या एकूण १६ केंद्रांवर मंगळवार (ता.१५) पासून शेतकऱ्यांची नोंदणी सुरु होईल. तशा सूचना प्राप्त झाल्या आहेत, अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली.खरीप हंगाम २०२०-२१ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत हमीभावाने मूग, उडदाची खरेदी करण्यासाठी केंद्र शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यास लवकरच मान्यता अपेक्षित आहे. त्यापूर्वी शेतकऱ्यांची नोंदणी आवश्यक आहे. त्यासाठी मंगळवारपासून नोंदणी सुरु करावी, अशा सूचना सहकार, पणन व वस्त्रोउद्योग विभागाच्या अवर सचिव सुनंदा घड्याळे यांनी दिल्या. महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, विदर्भ सहकारी पणन महासंघ, महाएफसीचे व्यवस्थापकीय संचालक, पणन विभागाच्या सहसंचालक निलिमा गायकवाड यांना दिल्या. जिल्ह्यात राज्य सहकारी पणन महासंघातर्फे परभणी, जिंतूर, बोरी, सेलू, पाथरी, सोनपेठ, पालम, पूर्णा येथे, तर विदर्भ सहकारी पणन महासंघातर्फे मानवत, गंगाखेड येथील केंद्रांवर शेतकरी नोंदणी सुरु होईल. उडदाला ६ हजार रूपये हमीभाव
‘महाएफसी’तर्फे शेतकरी उत्पादक कंपन्यांतर्फे मूग, उडीद खरेदीसाठी शेतकरी नोंदणी केली जाईल. यंदा मूगाला प्रतिक्विंटल ७ हजार १९६ रुपये, तर उडदाला प्रतिक्विंटल ६ हजार रुपये हमीभाव आहे.शेतकऱ्यांनी ऑनालाइन नोंदणीसाठी सात-बारा उतारा, पीकपेरा प्रमाणपत्र, आधारकार्ड, बॅंक पासबुकची सत्यप्रती आदी कागदपत्रासह सध्या सुरु असलेला मोबाईल क्रमांक अर्जात नमूद करणे आवश्यक आहे. खरेदीच्या नियोजनानुसार होणाऱ्या बैठकीत केंद्रे निश्चित करण्यात येतील, असे सूत्रांनी सांगितले.