महेश निमसटकर
शहर प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती दि.13:- भद्रावती शहरातील जवळे प्लाॅट येथे राहणाऱ्या एका युवकाने घरातच दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. १३ ला पहाटे ४ वाजता उघडकीस आली. मयूर विजय भुसे वय २० वर्ष असे मृतक युवकाचे नाव असून तो वरोरा येथील माता महाकाली पॉलिटेक्निकचा विद्यार्थी होता. शैक्षणिक तणावातून त्याने आत्महत्या केली असावी असे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले. त्याने महाविद्यालयात परीक्षा शुल्क दोन हजार रुपये भरले होते.मात्र त्याचे पैसे परत आले होते. त्यामुळे आपले शैक्षणिक वर्ष वाया जाईल की काय याची चिंता त्याला नेहमी सतावत होती. असेही घरच्याकडून कळले. मात्र आत्महत्येचे अधिकृत कारण कळू शकले नाही.आईवडील यापूर्वीच वारले असल्याने याचा व त्याच्या लहान भावाचा सांभाळ त्याची आजी व काका काकू करीत होते घटनेच्या दिवशी पहाटे ४ वाजता त्याची आजी पाणि भरण्यासाठी उठली असता घटना स्वयंपाकघरात स्लॅपला असलेल्या एका हुकात दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत मयूर आढळून आला. तेव्हा ही घटना उघडकीस आले. या घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. व शव शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे पाठविले.सदर घटनेचा अधिक तपास भद्रावती पोलीस करीत आहे.