महेश शिळीमकर
जिल्हा प्रतिनिधी पुणे
राज्यात लवकरच 5200 पोलिस शिपाई पदांची भरती काढण्यात येणार आहे. दुसर्या टप्प्यात आणखी सातहजार पदे भरण्यात येणार आहेत.राज्यात आणखी कारागृह उभारण्याची आवश्यकता आहे. त्याबाबत शासन निर्णय घेणार आहे. अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. गृहमंत्री वळसे-पाटील यांनी (दि.17) दुपारी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयला भेट देत आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी पोलिस महासंचालक संजय पांडेय, आयुक्त कृष्णप्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे उपस्थित होते. गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले,कोरोना परिस्थितीनुसार कैद्यांसाठी कारागृहात उपाय योजना केल्या आहेत. त्याबाबत सुचना दिलेल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार काही जणांना तुरुंगातून सोडण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यात काही नवीन जेलची निर्मीती करण्याची आवश्यकता आहे. त्याबाबतची मागणी आज झाली. त्यासंदर्भात शासन निर्णय घेण्यात येईल. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील समिती कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.