विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा,दि. ७ सप्टेंबर:- भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश शिक्षक सेल जिल्हा शाखेच्या वतीने शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी दिनांक ८ सप्टेंबर २०२१ ला दुपारी ४ वाजता गांधी चौक भंडारा येथे निदर्शने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे यांनी सांगितली आहे. त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिवराम गिरेऱ्हेपुंजे, शिक्षक सेलचे जिल्हा संयोजक कैलास कुंरजेकर, राज्य संयोजक डॉ. उल्हास फडके, मेघराज झंझाड यांनी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा, वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी प्रशिक्षणाच्या तारखा त्वरित घोषित करा, एक तारखेला वेतन मिळावे व विलंब करणाऱ्या अधिकाऱ्याला त्वरित निलंबित करा अशा विविध मागण्यांसाठी भंडारा येथील गांधी चौक येथे भारतीय जनता पार्टी सेलच्या वतीने निदर्शने व आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनात जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा संयोजक कैलास कुरंजेकर यांनी केले आहे.