संजीव बडोले
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
नवेगावबांध:- आज ६ मे रोज शुक्रवारला पंचायत सभागृह येथे झालेल्या अर्जुनी-मोरगाव पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या सविता कोडापे सभापतीपदी तर उपसभापती पदावर पंचायत समिती निवडणुकीत अपक्ष पंचायत समिती सदस्य होमराज पुस्तोडे यांना भारतीय जनता पक्षाने समर्थन देत अर्जुनी मोरगाव पंचायत समितीवर आपला झेंडा फडकावला आहे. पंचायत समिती सभापतिपद अनुसूचित जमाती महिला करता राखीव होते.कसेही व काहीही करून काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यात भारतीय जनता पक्षाने यश मिळविले.मात्र वंचित व अपक्ष उमेदवाराच्या माध्यमातून भाजपने पंचायत समितीची सत्ता पक्ष उमेदवाराला उपसभापतीपद न देता
ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.भाजपकडे ६ सदस्य असतानाही, भारतीय जनता पक्षाशी निष्ठा ठेवून ,पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढणाऱ्यापैकी पक्ष निष्ठा ठेवून निवडून आलेल्या पक्षाच्या पंचायत समिती सदस्याला कुणालाही उपसभापतीपद न देता अपक्षाला संधी देणे,म्हणजे जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीत अपक्षांना आम्ही सामावून घेणार असल्याचे संकेत यामाध्यमातून भाजपने दिले आहे.असे बोलले जात आहे.अर्जुनी मोर पंचायत समितीमध्ये सदस्य संख्या १४ असून, यात भाजपचे ६,काँग्रेस ४,राकाँ २,वंचित बहुजन आघाडी १ व अपक्ष १असे सदस्य निवडून आले होते.त्यात सभापतीपद हे अनुसूचित जमाती महिलाकरीता राखीव असल्याने व भाजपकडे उमेदवार नसल्याने भाजपने वंचित आघाडीच्या उमेदवाराला समर्थन दिले.तसेच भाजपकडून बंडखोरी करीत अपक्ष निवडून आलेले होमराज पुस्तोडेंना उपसभापतीपद देत सत्ता आपल्याच हाती राहील, असे नियोजन केले.यात काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी केली होती.सभापतीपदासाठी वंचितच्या सविता कोडापे यांच्याविरुध्द काँग्रेसच्या भाग्यश्री सयाम रिंगणात होत्या.यात कोडापे यांना ८ तर सयाम यांना ६ मते मिळाली.उपसभापती पदाच्या निवडणुकीत अपक्ष पु्स्तोडे याना ८ व राष्ट्रवादीच्या पुष्पलता दुरुगकर यांना ६ मते मिळाली.निवडणुकीनंतर नवनियुक्त सभापती व उपसभापती यांनी अर्जुनी-मोर पंचायत समिती क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आमचे प्रथम प्राधान्य असेल असे उभयतांनी सांगितले. निवडणुक अधिकारी म्हणून अर्जुनी मोरगाव चे उपविभागीय अधिकारी डॉ.विजय कुमार सूर्यवंशी,तहसीलदार विनोद मेश्राम,गट विकास अधिकारी विलास निमजे, विस्तार अधिकारी पंचायत राजकुमार ब्राह्मणकर यांनी काम पाहिले.