आंधळगाव पोलीस व भंडारा स्थागुशाच्या अधिकाऱ्यांनी केली कारवाई
विलास केजरकर
जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा : मोहाडी तालुक्यात येत असलेल्या व आंधळगाव पोलीस स्टेशन अंतर्गत परिसरातील शेतावर लावण्यात आलेले मोटारपंप चोरून शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या दोन चोरट्यांना आंधळगाव पोलीस व भंडारा स्थागुशाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातुन ६० हजार ७०० रुपयांचे ८ मोटारपंप जप्त करण्यात आले आहे. रविंद्र संपतशहा वाढवे, वय ४५ वर्ष व नरेश किसन सयाम, वय ३५ वर्ष दोघही रा. घोरपड, पो. कांद्री, ता. मोहाडी, जि. भंडारा अशी आरोपींची नावे आहेत.
दरम्यान जिल्हा परीषद माध्यमीक शाळा, आंबागड येथील विहीरीवरील मोटार पंप कोणीतरी चोरट्याने चोरुन नेल्याची तक्रार पोलीस स्टेशन आंधळगाव येथे नोंदविण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासुन आंधळगाव पोलीस स्टेशन अंतर्गत परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतावर पिकांना पाणी देण्याकरीता लावलेले मोटारपंप चोरीला जाण्याच्या
घटना वाढल्या होत्या. त्यामुळे मोटारपंप चोरट्यांचा शोध लावणे अत्यंत आवश्यक होते.
म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेला मोटारपंप चोरांचा शोध घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण यांनी एक पथक तयार करून मोटार पंप चोरांचा शोध घेण्याच्या सुचना व मार्गदर्शन केले.
दरम्यान सदर चोरी प्रकरणाचा सखोल अभ्यास करीत असतांना पोलीसांना रविंद्र संपतशहा वाढवे, वय ४५ वर्ष रा. घोरपड, पो. कांद्री, ता. मोहाडी, जि. भंडारा यांच्यावर दाट संशय आल्याने त्याच्यांवर लक्ष ठेवले असता संशय आधिकच बळावला. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली असता त्याने गावातीलच त्याचा साथीदार नरेश किसन सयाम, वय ३५ वर्ष, धंदा मजुरी, रा. घोरपड, पो. कांद्री, ता. मोहाडी, जि. भंडारा यांच्या मदतीने परिसरातील एकुण आठ मोटारपंप चोरी केल्याचे कबुल केले. पोलीसांनी दोन्ही आरोपींच्या सहायाने त्यांनी चोरी केलेले आठ मोटारपंप जप्त करीत आरोपीना अटक केली. दोन्ही आरोपींना पोलीस स्टेशन आंधळगाव यांच्या ताब्यात कायदेशीर कारवाई करीता सोपविण्यात आले. पुढील तपास आंधळगाव पोलीस स्टेशन ठाणेदार सुरेश मट्टामी हे तपास करीत असुन आणखी गुन्हे उघड होण्याचे चिन्ह दिसत आहेत.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोषसिंग बिसेन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक जयवंत चव्हाण, आंधळगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरेश मट्टामी, स. पो. नि. सौरभ घरडे, पो. हवा. राकेश इंगोले, पो. ना. राजु दोनोडे, सतीश देशमुख, शैलेश बेदुरकर, ईश्वरदत्ता मडावी, योगेश पेठे, हरिदास रामटेके, आशिष तिवाडे, नवनाथ शिंदे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली आहे.
“ज्या शेतकऱ्यांच्या मोटार पंप चोरीला गेलेले आहेत. त्यांनी आंधळगाव पोलीस स्टेशन मध्ये संपर्क साधुन खात्री करून घ्यावे. त्या शेतकऱ्यांना मोटार पंप दिल्या जाईल.”
श्री वसंत जाधव,
जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा.