विलास केजरकर
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा : येथील जे. एम. पटेल महाविद्यालयात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिवस हा शिवस्वराज्य दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांच्या मार्गदर्शनात शिवस्वराज्य दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा व शिवज्योत रॅलीचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. डी. आय शहारे होते. प्रमुख मार्गदर्शक समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रदीप मेश्राम, प्रमुख पाहुणे म्हणून गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. कार्तिक पनिकर, मराठी विभाग प्रमुख डॉ. उज्वला वंजारी, विभाग प्रमुख डॉ. अपर्णा यादव, सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. भीमराव पवार, राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख डॉ. जितेंद्र किरसान उपस्थित होते. त्यावेळी उपस्थितीत मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून सर्वांना शिवस्वराज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अखिल भारताचे प्रेरणास्थान असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी परकीय आणि स्वकीय अशा जुलमी सत्ताधीशांशी अनेक लढाया करून महाराष्ट्राच्या भूमीत स्वराज्याची स्थापना केली. सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून जनतेचे राज्य कसे असावे याचा आदर्श घालून दिला. व शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांनी सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केले होते असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी भोजराज श्रीरामे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशांत वालदेव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता जे. एम. पटेल महाविद्यालयीन शिक्षक, कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, महाविद्यालयीन कर्मचारी, विद्यार्थीनी सहकार्य केले.