महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या भद्रावती शाखेने मला नोकरीवरून काढून माझ्यावर अन्याय केला असून मला परत कर्तव्यावर रुजू करून घ्यावे, अशी मागणी या बॅंकेतील रोजंदारी कर्मचारी सतीश परशुराम लांडगे यांनी पत्रपरिषदेत केली. सतीश लांडगे यांनी पत्रपरिषदेत सांगितले की, आपले वडील बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या भद्रावती शाखेत दप्तरी म्हणून कार्यरत होते. सन २०१३ मध्ये ते सेवानिवृत्त झाले आणि २०१५ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. आईला सध्या ६७०० रुपये पेन्शन मिळत आहे. आईला मिळणारी पेन्शन अपुरी पडत असल्याने व घरखर्च भागत नसल्याने आपण रोजंदारी कर्मचारी म्हणून सदर बॅंकेत नोकरी स्वीकारली. ३ वर्षे नोकरी केल्यानंतर आपणास सन २०१७ मध्ये जी.एस.टी.लागू झाली म्हणून कामावरुन काढून टाकले. आपल्याला परत कामावर घ्यावे म्हणून आपण सदर बॅंकेचे शाखा व्यवस्थापक व चंद्रपूर येथील क्षेत्रीय व्यवस्थापक यांच्या कडे वारंवार निवेदने दिली. परंतु जेव्हा गरज पडेल तेव्हा तुम्हाला घेण्यात येईल असे आश्वासन देऊन आपल्याला आशेवरच ठेवले. या संदर्भात खा. बाळूभाऊ धानोरकर यांच्याकडे सुद्धा निवेदन दिले. अलिकडेच येथील शाखा व्यवस्थापकांना विचारणा केली असता कर्मचाऱ्याची आवश्यकता भासल्यास तुम्हाला बोलावतो व तुम्हाला प्राधान्य देतो असे सांगण्यात आले. मात्र त्यानंतर काही दिवसांतच याच बॅंकेच्या एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला कामावर घेतले असेही लांडगे यांनी पत्रपरिषदेत सांगितले. आपणही या बॅंकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा मुलगा असताना आणि तीन वर्षे सेवा केली असताना आपल्याला का घेण्यात आले नाही असा प्रश्नही लांडगे यांनी पत्रपरिषदेत उपस्थित केला. आपल्याकडे दोन-दोन शाखा व्यवस्थापकांचे अनुभव प्रमाणपत्र असताना कोणत्याही प्रकारचा अनुभव नसणा-या मुलाला घेऊन आपल्यावर अन्याय केल्याचे लांडगे यांनी पत्रपरिषदेत सांगितले. याबाबत शाखा व्यवस्थापक विश्वजीत साहू यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रोजंदारी कर्मचाऱ्यांना परत कर्तव्यावर घेतलेच पाहिजे असे काही बंधन नाही. जेव्हा गरज पडते तेव्हा बॅंक कोणालाही घेऊ शकते व केव्हाही काढू शकते. त्यामुळे असे रोजंदारी कर्मचारी परत घेण्याचा दावा करु शकत नाही असे सांगितले.

