महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : तालुक्यातील मांगली येथील लाईनमन मद्यपी व कामचुकार असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून त्याला तात्काळ निलंबित करून त्याच्या ऐवजी दुसरा लाईनमन नियुक्त करण्यात यावा अशी मागणी मांगली परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.मांगली परिसरातील शेतकऱ्यांनी भद्रावती वीज वितरण कंपणीच्या सहाय्यक अभियंत्याला नुकतेच एक निवेदन सादर केले. त्यात मांगली परिसरात सध्या शेंडे नामक लाईनमनची नियुक्ती करण्यात आली आहे. हा लाईनमन अत्यंत कामचुकार असुन तो सतत दारुच्या नशेत राहतो व आपले कर्तव्य नीट पार पाडत नाही. त्याच्या या कामचुकारपणामुळे या परिसरातील विद्युत व्यवस्था पुर्णपणे कोलमडली आहे.तो शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत नसल्यामुळे या भागातील विद्युत पुरवठा सुरळीत राहात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचन करता येत नाही.परिणामी त्यांच्या शेतमालाचे नुकसान होत आहे. सदर लाईनमन शेतकऱ्यांशी ऊध्दटपणे वागतो व आपले काम रेंगाळत ठेवतो. या लाईनमन च्या कामचुकारपणामुळे शेतकर्यांना अनेकदा पैसे देऊन खासगीरित्या काम करवून घ्यावे लागते.त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थीक भुर्दंडही सोसावा लागतो. सध्या या परिसरात धानपिकाला पाण्याची आवश्यकता असुन विज पुरवठा खंडीत राहात असल्याने धानपिकाला पाणी देता येत नाही.असे नमुद करून शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्या लक्षात घेऊन या लाईनमनला निलंबीत करुन या ठिकाणी कर्तव्यदक्ष लाईनमनची नियुक्ती करावी व परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत ठेवावा अशी मागणी करण्यात आली आहे.

