अर्जुनीमोरगाव तालुका प्रशासनाच्या वतीने शासकीय अधिकार्यांपासून सर्वसामान्य जनतेचा सहभाग.
27 हजार 932 कुटुंबातील 1लक्ष 20 हजार 319 लोकांची जनजागृती.
संजीव बडोले
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया.
नवेगावबांध दि.4ऑक्टोबर:-कोरोना या जागतिक महामारीवर विजय मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी गोंदिया दीपक कुमार मीना यांनी राज्य शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाला गती देण्यासाठी जिल्ह्यातील 10 लक्ष नागरिकांना एकाच वेळी सम्पर्क करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला होता.हा अभियान यशस्वी करण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांपासून ते तालुक्यातील सामान्य नागरिकांनी आपला सहभाग दर्शविला.
3 ऑक्टोबर ला राबविण्यात आलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी माझी जनजागृती या विशेष मोहिम यशस्वी करण्यासाठी 2579 विविधविभागाचे , स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी ,अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सत्तावीस हजार 913 कुटूंबांना भेटी देऊन 1लाख 20 हजार 319 नागरिकांशी संवाद साधून जनजागृती केल्या गेल्याची माहिती अर्जुनीमोरगाव चे तहसीलदार विनोद मेश्राम यांनी दिली आहे. अर्जुनी मोरगाव च्या उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, तालुक्यातील सर्व विभागाच्या वतीने जमेल तेवढे हे जनजागृती अभियान यशस्वी करण्याचा प्रयत्न केला गेला. माझे कुटुंब माझी जबाबदारी माझी जनजागृती हे अभियान यशस्वी करण्यासाठी शासकीय, निमशासकीय,खाजगी कार्यालये,ग्रामपंचायत कार्यालये,शाळा,नगरपंचायत, महिला बचत गट ,युवा मंडळ , स्वयंसेवी संस्था या मोहिमेत सहभागी झाले होते. अर्जुनी मोरगाव तालुक्यात काही गावात सकाळपासून तर काही गावात सकाळी दहा वाजेपासून या मोहिमेला सुरुवात झाली. या मोहिमेत सहभागी झालेले जिल्हा परिषद शाळा व खाजगी शाळेतील शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य विभागाचे कर्मचारी, सरपंच, पोलिस पाटील, महिला बचत गट, राशन दुकानदार, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, गावातील सामाजिक कार्यकर्ते, तालुक्यातील 29 विभागातील शासकीय ,निमशासकीय अधिकारी ,कर्मचारी यांच्यापासून तर सर्वसामान्य नागरिकांनी प्रत्येकी दहा घरांना भेटी देऊन कोरोनाव्हायरस च्या संसर्गापासून दूर राहण्याविषयी तसेच सर्दी, ताप, खोकला, मधुमेह, रक्तदाब ,लठ्ठपणा असलेल्या व्यक्ती यांनी रुग्णालयात जाऊन तपासणी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच कोरोना काळात नागरिकांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी तसेच कोरोना रुग्णांची काळजी कशी घ्यायची याबाबतचे मार्गदर्शनही यावेळी करण्यात आले.