अविनाश डव्हळे, तालुका प्रतिनिधी लोणार
लोणार :- तालुक्यातील हिरडव या गावांमध्ये पतीने स्वतःच्या पत्नीचा गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तालुक्यात हत्येची ही सलग दुसरी घटना समोर येताच एकच खळबळ उडाली आहे. आरोपी पती विकास शेषराव घायाळ वय वर्षे ३० याने आपली पत्नी लक्ष्मी विकास घायाळ वय वर्ष ३० हिला आपल्या स्वतःच्या शेतात पिकाची पाहणी कराण्याच्या बहाण्याने घेऊन गेला व त्या ठिकाणी तिची साडीच्या पदराने गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार दिनांक ४ सप्टेंबर रोजी घडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. आरोपी पती दारूच्या आहारी गेल्यामुळे सतत दोघांमध्ये कुठल्यान कुठल्या कारणांवरून भांडण होत असे. आरोपी विकास घायाळ हत्या करून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार रवींद्र देशमुख, पो.कॉ. गुलाबराव झोटे, चंद्रशेखर मुरडकर, कैलास चतरकर, सुनील केसरकर,गजानन ठाकरे, यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृत महिलेचा भाऊ संतोष भास्कर शहाणे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पती विरोधात कलम ३०२ भादवी नुसार खुणाचा गुन्हा दाखल केला आहे.