ताज्या घडामोडी

खंडणीसह अनेक गुन्हयांमध्ये वॉन्टेड गुंड अखेर ठाण्यात जेरबंद

शरण खन्ना
उपजिल्हा प्रतिनिधी ठाणे

ठाणे २४ ऑक्टोबर : खंडणी, जबरी चोरी आणि खूनाचा प्रयत्न अशा गंभीर स्वरुपाच्या २४ गुन्हयांची नोंद असलेला सराईत गुन्हेगार ओमकार सतीश भोसले (२१, रा. कोलशेत रोड, ठाणे) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटच्या पथकाने अटक केली. त्याच्या अंगझडतीमध्ये एक गावठी रिव्हॉल्व्हर हस्तगत करण्यात आले आहे. त्याला २७ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने शुक्रवारी दिले.
ओमकार याच्यावर नौपाडा, कासारवडवली, वागळे इस्टेट आणि चितळसर या पोलीस ठाण्यांमध्ये हाणामारी, जबरी चोरी आणि खूनाचा प्रयत्न असे अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद आहेत. यातील वागळे इस्टेटमधील दोन तर वर्तकनगर आणि कासारवडवली येथील प्रत्येकी एक अशा चार गुन्हयांमध्ये तो गेल्या पाच महिन्यांपासून वॉन्टेड होता. तो वागळे इस्टेट, श्रीनगर भागातील हनुमाननगरमधील मुनशी तबेल्याच्या समोर येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार दिलीप शिंदे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार, अनिल सुरवसे, भूषण शिंदे पोलीस हवालदार दिलीप शिंदे, राजेश क्षत्रीय, जगदीश न्हावळदे, शिवाजी रायसिंग, जमादार प्रदीप कदम, बाबू चव्हाण, निवृत्ती महांगरे, हवालदार जाधव, संजय सोंडकर, विजय गोरे, अजय फराटे, शशीकांत नागपूरे, राजेंद्र गायकवाड, मनोज पवार, पोलीस नाईक अजित शिंदे कल्पना तावरे आणि सुजाता शेलार आदीच्या पथकाने २२ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ओमकार याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीमध्ये एक गावठी बनावटीचे रिव्हॉल्व्हर आणि एक जिवंत काडतुस हस्तगत केले आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्याखाली श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त सुरेश मेकला, गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस आयुक्त प्रविण पवार, उपायुक्त दीपक देवराज, सहायक पोलीस आयुक्त किसन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने यशस्वी केली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close