ग्यानीवंत गेडाम
तालुका प्रतिनिधी वरोरा
वरोरा-27आक्टों.2020
महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात शिक्षण , संशोधन तथा विस्ताराच्या कार्या मध्ये अग्रभागी असणाऱ्या कृषी विद्यापीठातील अधिकारी-कर्मचार्यांच्या सातव्या वेतन आयोगाच्या मागणी संदर्भातील आंदोलनाला प्रतिसाद देत आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा येथील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे . राज्यातील जवळपास सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला आहे. परंतु कृषी विद्यापीठातील अधिकारी तथा कर्मचारी यांना या वेतन आयोगापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे . म्हणुन विद्यापीठीय अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झालेली आहे . त्या निषेधार्थ राज्य स्तरीय संघटनेच्या माध्यमातून आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे .त्यानुसार दिनांक 27 ऑक्टोबर पासून काळी फीत लावून निषेध व्यक्त करीत कर्मचारी कार्यरत राहणार आहे . त्यानंतर दिनांक 2 नोव्हेंबर पासून लेखणी बंद आंदोलन करण्यात येणार आहे. त्यांनतर दिनांक 6 नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व कर्मचारी अधिकारी एक दिवशीय सामुहिक रजा आंदोलन करणार आहे . त्या पार्श्वभूमीवर विविध अधिकारी, लोकप्रतिनिधी द्वारे निवेदनाच्या माध्यमातून आपली मागणी शासनापुढे ठेवण्यात येत आहे . त्याचाच एक भाग म्हणून कृषी महाविद्यालयातील अधिकारी-कर्मचार्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच चंद्रपुर- आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू भाऊ धानोरकर तसेच वरोरा भद्रावती मतदारसंघाच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची भेट घेऊन आपले निवेदन दिले. त्यामधे विद्यापीठीय अधिकारी कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगा सह 10,
/20/30 वर्षा नंतर लागु असलेली सुधारित आश्वासीत प्रगती योजना पुर्वलक्षी प्रभावाने लागु करण्यात यावी या बाबत ची मागणी करण्यात आलेली आहे . सदर मागण्यांची पुर्तता त्वरित करण्यात यावी अन्यथा कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे होणाऱ्या परिणामाला जबाबदार शासन राहील या संदर्भातील इशारा देण्यात आलेला आहे . या शिष्टमंडळामधे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत अमरशेट्टीवार , डॉ . सुहास पोतदार , डॉ मनोज जोगी, डॉ .सतीश इमडे, राहुल तायडे, महिला सदस्य डॉ . अश्विनी मानकर , मिली पूजदेकर, अश्विनी दवंडे उपस्थित होते .