योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
चंद्रपूर (१५ नव्हें.)- चंद्रपूर जिल्हातील नागभीड तालुक्यापासून तळोधी बाळापूर येथून अगदी १० कि.मी. अंतरावर असलेल्या येनोली माल या गावी अश्विन दशमीला आदिवासी गोवारी जमातीची प्राचीन सांस्कृतिक गोदन तथा ढाल पूजा करण्यात आली.
आदिवासी गोवारी जमातीमध्ये ढाल पूजा ही प्राचीन काळापासून करण्यात येते. प्राप्त गोवारी जमातीच्या पूर्वेतिहासानुसार गोवारी जमातीमध्ये आद्य गुरू पहानदी पारी कुपार लिंगो तथा माता रायताड जंगो च्या प्रतिकात ढालीला पुजण्याची प्रथा आहे. विशेष म्हणजे दिवाळी या सणामध्ये हिंदू धर्माची जेव्हा लक्ष्मी पूजा असते त्याच्या पहिल्या दिवशी गोवारी जमाती मध्ये महिषासुर पेन , शिवाऱ्यापेन , ठाकूर पेन या पुर्वजांची पूजा केली जाते. तसेच लक्ष्मी पूजा न करता त्याच दिवशी ढालींची सजावट करतात. सजावट करण्यापूर्वी एका बांबूच्या टोपल्यात ठेवलेले सर्व देव काढतात. जे की पुरुष किंवा स्त्री यांच्या हे मृत्यूनंतर पेनकारण नावाची धार्मिक विधी करून आपल्या पूर्वजांना उतरवितात आणि त्यांना आपल्या देवात समाविष्ट करतात. जंगलातून एक मोहाची चा झाड किंवा खांब आणून अंगणात गाडले जाते. त्याठिकाणी एक मातीचा बोहला तयार करतात. ३० ते ३५ फूट लांबीच्या वेळू ला गेरूनी रंगवून बांबूच्या टोकावर ढाल चढवितात. ढालीच्या वर मोरपंखांचा कुचा बांधले जाते. जर ढाल पुरुष रूपाची असेल तर त्या ढालीला पिवळा दुपट्टा तसेच स्त्री रूपाची असेल तर चोळी बांधून बांगळ्या , फुली ची दोरी चढवले जाते. आणि विधिवत पूजा करून ढाल सजवून काट सावरी च्या झाडाखाली ठेवली जाते. लक्ष्मी पूजेच्या दुसऱ्या दिवशी आखरावर जाऊन गोवारी जमातीचा भूमक सेनाने गोदन बांधतो. ज्याला आखर बांधणे असे ही म्हणतात. त्याठिकाणी खिल्ला मुठवा या पुर्वजांची पूजा करून मुठपुजा केली जाते. आणि त्या गोदनावर गवताचे घोनाड ठेऊन गावातील गायी चालवले जाते. नंतर दफरा , चिपळ्या , बासरी आणि विशिष्ट वेषभूषेच्या
वाद्यांत नाचत कुदत बिरवे म्हणून ढाल नृत्य करीत गावातील सर्व ढाली एकत्र करून आखरावर आणले जाते. गोदनावर सर्व ढाली एकत्र आल्यानंतर दफरा , चिपळ्या , बासरी आणि विशिष्ट वेषभूषेत बिरवे म्हणून काठी नृत्य , नाचले जाते. तर गावातील इतर लोकांना आपल्या कलागुण दाखवले जाते. आणि मग गावातील प्रत्येक घरी त्या ढाली नाचत कुदत नेतात.प्रत्येक गोवारी समाजाच्या घरी फिरविली जाते व स्त्रिया ढालींची पूजा करतात आणि सायंकाळी ढाल आपल्या आपल्या घरी नेतात.