विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा, दि. ११ जानेवारी:- मराठी प्राध्यापक परिषदेच्या मार्गदर्शक-आधारस्तंभ होत्या. २००८ ला नागपूर येथे झालेल्या प्राध्यापक परिषदेच्या एकोणिसाव्या अधिवेशनाच्या अध्यक्ष आणि प्रसिद्ध लेखक-समीक्षक, डी.लीट्. प्राप्त आर एम पटेल महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राचार्य डाॅ. जुल्फी शेख यांचे सोमवार दि. ११ जानेवारी २०२१ च्या मध्यरात्री दुःखद निधन झाले. डाॅ. शेख ह्यांचे रा.तु.म.नागपूर विद्यापीठ व गोंडवाना विद्यापीठ मराठी प्राध्यापक परिषदेच्या वाटचालीत खूप महत्त्वपूर्ण योगदान होते. कवयित्री, संशोधक, वक्ता म्हणून प्रख्यात असलेल्या प्राचार्या डॉ. शेख यांनी तीन दशके अध्यापन कार्य केले आहे. तसेच अनेक वर्षे प्राचार्य पदाची यशस्वी धुरा सांभाळून अलीकडेच सेवानिवृत्त झाल्या होत्या. रा.तु.म. नागपूर विद्यापीठाची डी.लिट्. ही सर्वोच्च पदवी त्यांच्या मुस्लिम व मराठी संत साहित्यावरील संशोधनावर त्यांना प्राप्त झाली होती. अक्षरवेध, मी कोण, मधुशाला (अनुवाद) हे काव्यसंग्रह, मुस्लिम व मराठी कविता, संत, तुकाराम, संत ज्ञानेश्वरांचा वाड्मयीन वारसा, नवे प्रवाह नवे स्वरूप, उर्दू गालिब ए गझल इत्यादी समीक्षा-संपादने ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
११ व्या मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणा-या डाॅ. जुल्फी शेख यांना अनेक खाजगी तसेच शासकीय विविध मान्यताप्राप्त पुरस्कारही प्राप्त झाले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व गोंडवाना विद्यापीठ मराठी प्राध्यापक परिषदेतर्फे त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे डाॅ. जुल्फी शेख यांचा जन्म हा मुस्लिम समाजात झाला असला तरी सुध्दा उर्दु व मराठी विशलेषणात उत्कृष्ट पकड होती. शांत व मनमिळावू तसेच चिकित्सक दुरदृष्टी असणा-या अशा कुशल व्यक्तीमहत्वाला अखेरचा सलाम.
गोंदिया एज्युकेशन सोसोयटी व्दारा संचालित भंडारा येथील आर एम पटेल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जुल्फी शेख ह्या जे एम पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांना लहान भावाप्रमाणे मानत होत्या. त्यामुळे मोठ्या बहिणीची पोकळी भरून काढता येणे अशक्यच आहे अशी खंत जे एम पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी व्यक्त केले आहे. तसेच डॉ. जुल्फी शेख यांना जे एम पटेल महाविद्यालयाच्या वतीने आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.