सुयोग जाधव
तालुका प्रतिनधी पोलादपूर
पोलादपूर गोळेगणी येथील तीव्र वळणावर साईडपट्टीवर ठेवलेल्या लाकूडफाटयामुळे रस्ता अरूंद होऊन रस्त्यालगतच्या मोरीवरून खाली घसरलेल्या एस.टी. बसला पुन्हा रस्त्यावर आणण्यासाठी महाडचे डि वाय एस पी आयपीएस अधिकारी निलेश तांबे यांनी रेस्क्यूटीमच्या मदतीने महत्वपूर्ण मार्गदर्शन करून बस रस्त्यावर आणण्यास सहकार्य केले. पोलादपूर तालुक्यातील कुडपण खुर्द धनगरवाडी भागात शुक्रवारी सायंकाळी झालेला टेम्पोचा अपघातानंतर दुसऱ्या दिवशी महाड येथील मदत ग्रुप आणि साळुंखे रेस्क्यू टिमसोबत अपघातस्थळी पाहणीसाठी गेलेल्या डिवायएसपी आयपीएस अधिकारी निलेश तांबे यांना परतीच्या प्रवासावेळी नुकत्याच झालेल्या जंगलतोडीतील लाकूड फाटा तोडून सहज वाहतूक करता यावी यासाठी साईडपट्टीवर किटा रचल्याने रस्ता अरूंद होऊन चालक दरेकर यांचा ताबा सुटल्याने कुडपण ते पोलादपूर अशी परतीचा प्रवास करणारी एस.टी.बस (एमएच 20 डी 9657) ही एका इको व्हॅनला धडकून मोरीवरून खाली गटारामध्ये घसरल्याचे दिसून आले. चालक दरेकर यांनी गोळेगणीतील या वळण उताराला समोरून येणाऱ्या व्हॅनला धडकून होणारा मोठा अपघात टाळण्यासाठी कौशल्य व ताकद पणाला लावून एस.टी.बस कारपासून दूर नेण्याच्या प्रयत्नात बस रस्त्याच्या मोरीपासून खाली घसरून गटारामध्ये अडकली. यावेळी डीवायएसपी आयपीएस अधिकारी निलेश तांबे यांनी रस्त्यावर उतरून चालक दरेकर यांना मार्गदर्शन केले तर रेस्क्यू टिमचे प्रशांत साळुंखे आणि अन्य सदस्य यांनी बसच्या टायरखाली दगड आणि किटा ठेऊन बस उठविण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. यामुळे गटारामध्ये अडकलेली बस पुन्हा रस्त्यावर आणण्यात यश चालक दरेकर यांना यश आले. पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या साईडपट्टीवर दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये जंगलतोड करून वाहतुक सोपी व्हावी यासाठी लाकूडफाटा व किटा रचल्या जात असल्याने सदरची वाहतूक करणाऱ्यांना जरी सुलभता निर्माण होत असली तरी रस्ता अरूंद होत असल्याने दोन वाहनांपैकी एका वाहनालाच रस्त्यावरून वाहतूक करता येत असून दोन वाहने शेजारून गेल्यास अपघाताची शक्यता वाढीस लागली आहे.