राष्ट्रवादीने प्रथमच खोलले खाते
प्रवेशपत्र असतानाही पत्रकारांना गेटवरच रोखले
महेश निमसटकर
शहर प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती,दि.१८:-भद्रावती तालुक्यात आज झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीच्या मतमोजणीत विविध राजकीय पक्षांनी अनेक ग्राम पंचायतीवर आपले वर्चस्व प्रस्थापित केल्याचा दावा केला असून भाजपाने सर्वाधिक २९ ग्राम पंचायती जिंकल्याचा दावा केला आहे.
आज दि.१८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीत मतमोजनीला सुरुवात झाली.५३ ग्राम पंचायतीच्या मतमोजनीसाठी २० टेबल, ४० कर्मचारी आणि २० पर्यवेक्षक यांची व्यवस्था करण्यात आली होती.सर्वात प्रथम जेना या ग्रामपंचायतीची मतमोजनी होऊन निकाल जाहीर झाला.त्यानंतर इतर ग्राम पंचायतीचे निकाल घोषित झाले.दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व निकाल हाती आले. ५७ पैकी पानवडाळा, कचराळा, विसापूर(रै) आणि कोकेवाडा(मा.) या ग्राम पंचायती अविरोध निवडून आल्या. या ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये २९ ग्राम पंचायतीवर आपले वर्चस्व निर्माण झाल्याचा दावा भाजपाने केला आहे.तर पहिल्यांदाच ग्रामीण भागातील निवडणुकीत रस घेणा-या राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाने ७ ग्राम पंचायतीवर ताबा मिळविल्याचा दावा केला आहे. तर शिवसेनेने १६ ग्राम पंचायती ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. कांग्रेसने भाजपाचे जि.प.सदस्य मारुती गायकवाड यांच्या क्षेत्रात येणा-या चंदनखेडा आणि वायगाव (तु.) या दोन्ही ग्राम पंचायती भाजपाकडून हिसकावून घेतल्या. मतमोजनी दरम्यान, विजयी उमेदवार व प्रतिस्पर्धी उमेदवार यांच्यात अगदी कमी मतांचा फरक असल्यानेचोरा,घोनाड,घोट-निंबाळा आणि आष्टा येथील काही प्रभागामध्ये फेरमतमोजनी करण्यात आली.त्यात मात्र काहीही बदल झाला नाही. तसेच पेवरा येथे कलावती श्रीराम बावणे आणि हेमलता वासुदेव भोगेकर यांना प्रत्येकी ६५ मते मिळाली. त्यामुळे ईश्वर चिठ्ठी टाकण्यात आली.त्यात कलावती बावणे या विजयी झाल्या. तसेच कोंढेगाव(माल) येथे लता विनायक दाभेकर आणि रजनी निवृत्ती भोयर यांना प्रत्येकी ४८ मते पडली. त्यामुळे घेण्यात आलेल्या ईश्वर चिठ्ठीत लता दाभेकर विजयी झाल्या. तर कढोली येथे घेण्यात आलेल्या ईश्वर चिठ्ठीत निलेश नथ्थू मेश्राम विजयी झाले.त्यांना आणि त्यांचे प्रतिस्पर्धी प्रफुल्ल महादेव पेटकर यांना प्रत्येकी १०७ मते मिळाली होती.ही मतमोजनी निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार महेश शितोळे यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार तनगुलवार, भांदक्कर, तथा इतर मतमोजनी अधिकारी यांनी पार पाडली.त्यांना संवर्ग विकास अधिकारी डाॅ.मंगेश आरेवार, उपमुख्याधिकारी जगदिश गायकवाड यांनी सहकार्य केले.
दरम्यान, मतमोजनीचे वृत्तसंकलन करण्याकरीता गेलेल्या पत्रकारांना त्यांच्याकडे निवडणूक अधिका-यांचे प्रवेशपत्र असताना देखिल पोलिसांनी गेटवरच अडविले. याबाबत वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पांडे आणि तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी महेश शितोळे यांना कळविल्यानंतर पत्रकारांना प्रवेश देण्यात आला.