मराठी साहित्यातील ध्रुवतारा : अण्णा भाऊ साठे-विठ्ठल साठे.
आज मराठीमायभूमीचे महान सुपुत्र अण्णा भाऊ साठे यांची जयंती आहे.अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्वात प्रथम सर्वांना खूप खूप शुभेच्छा! तसं पाहिलं तर अण्णा भाऊ साठे यांना मी माझे गुरु मानतो. लेखणी सारख्या श्रेष्ठ आणि पवित्र साहित्याला स्पर्श करावा. आपणही त्या साहित्याच्या माध्यमातून काही तरी लिहावे .याची प्रेरणा मला अण्णा भाऊ यांच्याकडूनच मिळाली. त्यामुळे अण्णांवर माझी भक्ती आहे. अण्णा भाऊ साठे यांच्यासंबंधी मी अनेक लेख लिहिले आहेत. दोन पुस्तके सुद्धा लिहिली आहेत. त्यांच्या ‘ कृष्णाकाठच्या कथा ‘ या कथा संग्रहातील कथांवर आधारित दूरदर्शनवर मालिकेचे पटकथा लेखन आणि संवाद लिहिले आहेत. माझ्या मते सदर मालिका दूरदर्शनने पाच वेळा प्रसारीत केली आहे. सध्या गुरूवार आणि रविवारी मालिकेच भाग प्रसारित होत असतात. असो. एवढं सगळं कथन करण्यामागील कारण एकच आहे की मी अण्णा भाऊ यांचा भक्त आहे.हे स्पष्टपणे सांगणे! १९४९ साली अण्णा भाऊ यांची पहिली कथा ‘माझी दिवाळी ‘ही प्रकाशित झाली. कथा प्रकाशनापूर्वी अण्णा पोवाडे, लावण्या ,गीतं लिहित होते. त्यांच्या काव्य रचनेची प्रेरणा होती कामगार चळवळ! ते स्वतः गिरणी कामगार होते आणि कामगार संघटनेचे सक्रीय सभासद होते.म्हणतात माणूस प्रेमात पडला की त्याला काव्य सुचते. तद्वतच चळवळीत उतरलेला माणूस सुद्धा कवी किंवा लेखक होतो. अण्णा याला अपवाद नव्हते. प्रेमात पडणारांचे पुढे काय होते ?हा प्रश्न बाजूला ठेऊ या. परंतु चळवळीत उतरलेल्या माणसासंबंधी निश्चित बोलता येऊं शकते. चळवळीत उतरलेला माणूस निस्वार्थ भावनेने उतरला असेल तर त्याला मानवीमूल्यांची चांगली जाण निर्माण झाल्या शिवाय राहत नाही. त्या मुल्यांसाठी आपले सर्वस्व अर्पण करण्याची त्याची तयारी असते.आणि तो करतो.अनेक उदाहरणे आहेत. चळवळीत कार्य करताना अण्णा भाऊ यांना मानवीमूल्यांची जाण आली होती. म्हणूनच त्यांनी रस्त्यावरच्या संघर्षाला लेखणीची जोड दिली . आणि आपले सबंध जीवन मानवमूल्यांसाठी समर्पित केले .वयाच्या अकराव्या वर्षी वाटेगाव सोडून आपल्या परिवारासोबत मुंबईनगरीच्या रस्त्यावर पाऊल ठेवलेल्या तुकारामांच्या मनात फक्त जगणे एवढाच विचार असेल. परंतु नियतीने तुकारामला फक्त पोट भरण्यासाठी आणि जगण्यासाठी निर्माण केले नव्हते.नियतीने त्यांना निर्माण केले होते मानवतेचा रक्षक म्हणून!आणि नियतीने दिलेली ही भूमिका अण्णांनी प्रामाणिकपणे निभावली. जीवनातील सर्व व्यक्तीगत बाबी बाजूला ठेवून ते माणसांसाठी लढत राहिले. माणसांमध्ये त्यांनी कधी फरक केला नाही. समतेची कास धरून विषमतेचे अस्तित्व नष्ट करणे हे त्यांचे ध्येय बनले.म्हणूनच त्यांच्या साहित्यात जसे विष्णूपंत कुलकर्णी वावरताना दिसून येतात. तसाच स्मशानात सोनं शोधणारा भीमा भटकताना दिसून येतो.दुष्काळात गोरगरीब अन्नासाठी तडफडत असताना धान्याचा साठा करून माणूसपण फेकून दिलेला मठकरी आहे तर गोरगरीबांसाठी हातात तलवार घेऊन मठक-याचा मठ लुटून गोरगरिबांना जगवणारा फकीरा सुद्धा आहे.जशी गरीब चंदन आहे तशीच श्रीमंत मयूरा सुद्धा आहे.जशी आवडी आहे तशीच चित्रा सुद्धा आहे. दलित स्त्रीसाठी आपल्या आयुष्याचे बलिदान देणारा सतू भोसला आहे तर ब्रिटिशांना इमान विकलेला डँनियल सुद्धा आहे.किती किती लिहावे? अण्णांनी निर्माण केलेल्या साहित्याचा परिघ आवाक्याबाहेरच राहतो. त्यांच्या साहित्याला कोणतेही एक लेबल लावून चालू शकत नाही नव्हे ते शक्य नाही. फार तर माणसासाठी माणसांचे साहित्य .असे म्हणता येईल. अण्णा हयात असताना त्यांच्या साहित्याला साहित्य म्हणून मान्यता द्यायला प्रस्थापित साहित्यिक तयारच नव्हते. प्रस्थापित साहित्यिकांना अण्णा भाऊ यांच्या साहित्याची ताकत त्या वेळेस समजून आली नाही.पण त्या वेळच्या समाजाला मात्र अण्णा भाऊ यांच्या साहित्याची ताकत समजली होती.म्हणूनच अण्णांचे साहित्य आजपर्यंत जिवंत राहिल्याचे दिसून येते.त्यांच्या साहित्यावर शोध निबंध लिहिले जातात.प्रबंध लिहिले जातात.साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असलेले साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांच्यावर ग्रंथ लिहितात. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर व्याख्याने देणारे असंख्य विचारवंत आढळून येतात. यात गैर काहीच नाही. हा सुद्धा नियतीचाच चमत्कार म्हणायचा! आता हेच उदाहरण घ्या ना, शासनाचे मानधन मिळवण्यासाठी अण्णांना मंत्रालयात जोडे झिजवावे लागत होते .आज मंत्री अण्णा भाऊ साठे यांच्या चरणी नतमस्तक होताना दिसून येतात.नियती!दुसरं काय? परंतु हे इतके सहज घडलेले नाही.अण्णांनी आपल्या कर्तृत्वाने जगाला दिपवून टाकले .म्हणतात ध्रुव नावडततीचा होता.म्हणून त्याला राजाच्या मांडीवर बसू दिले नाही. या घटनेमुळे ध्रुव क्रोधीत झाला नाही. संतापला ,चिडला नाही.त्याने महान आणि कठोर तपस्या केली आणि अढळ पद मिळविले. अण्णा भाऊंनी ध्रुवाचाच मार्ग धरला. आणि आपला प्रवास सुरु केला.इतर क्षेत्रात तर ते अजोड ठरलेच.परंतु मराठी साहित्य क्षेत्रात ते ध्रुव तारा बनून प्रकाशमान झाले.आजही ते प्रकाशमान आहेत आणि या पुढेही राहतील!-विठ्ठल साठे.नियंत्रक,जैन विचार मंच.